Loading...

Blogs

तटबंदी ढासळताना…

<br />
<b>Notice</b>:  Trying to access array offset on value of type bool in <b>/home1/cosmi4zz/aroundpune.com/wp-content/themes/aroundpune/single-blog.php</b> on line <b>131</b><br />
Yogesh Shejwalkar
Share
3 Min Read

संस्मरणीय क्षण, अनुभव आणि प्रवास हे बहुतेक वेळा ध्यानीमनी नसताना आकार घेतात आणि त्यामुळेच मनावर खोल ठसा उमटवून जातात. कालचा प्रसंगही अगदी असाच.

अनेक आंतरराष्ट्रीय पारितोषिके सातत्याने मिळवणारी फोटोग्राफर डॉली काबरिया तिला उत्सुकता असलेल्या पुण्यातल्या जुन्या ठिकाणांची यादी मेल करते काय… मग मुद्दामून गर्दी टाळण्यासाठी वीक-डेला दुपारी आम्ही (मी, अपर्णा आणि डॉली) बाहेर पडतो काय… आणि एका वास्तुशिल्पाचे मोहून टाकणारं दर्शन होतं काय… सगळंच अनपेक्षित !!

काल दुपारी बुधवार पेठेतल्या ‘नगरकर वाड्यासमोर’ उभं राहिल्यावर पहिल्यांदा डोळ्यांवर विश्वासच बसेना. इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक मार्केटच्या गर्दीत ‘सन 1890’ असं आपल्या निर्मितीचं वर्ष धारण केलेल्या वाड्याचं भक्कम दगडी प्रवेशद्वार खंबीरपणे उभं होतं. त्याच्याकडे पाहून का कोणास ठाऊक… पण कायम युद्धासाठी सज्ज असलेला सैनिक तेलपाणी केलेलं आपलं वजनी चिलखत चढवून स्थितप्रज्ञपणे उभा आहे असं वाटून गेलं. नंतर समजलं की बदलत्या काळाशी आणि वाढत जाणार्‍या वयाशी त्याची लढाई निरंतरपणे सुरूच होती.

सुरुवातीचा काही वेळ, 125 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या त्या वाड्याची रचना आणि भव्यता पाहण्यात गेल्यावर आम्ही जरा भानावर आलो. मग वाड्यात वास्तव्याला असलेले एक काका भेटले. 1941 सालापासून त्यांचं कुटुंब तिथेच भाडेकरू म्हणून तिथे असल्यामुळे आठवणींचा बराच मोठा पट उलगडला गेला. वाड्याची रचना, वापरलेला कच्चा माल, सुरूवातीला खाली मोकळया असणार्‍या भागात उभ्या केलेल्या चुन्याच्या भिंती अशी बरीच माहिती मिळाली.

कधी काळी 18 बिर्‍हाडे वास्तव्यास असलेल्या या वाड्यात आता जेमतेम तीन-चार कुटुंब राहतात. वरच्या मजल्यांची सुरू झाली पडझड आणि जिन्याच्या निसटणार्‍या पायर्‍या हे लोक कमी होण्याचं मुख्य कारण. फिरता फिरता वाड्याच्याा मागील भागात आलो तर तो भाग पूर्ण भुईसपाट झालेला… ते भग्नावशेष पाहून तर पोटात गोळाच आला.

वाड्याची नोंद हेरिटेज प्रॉपर्टी म्हणून झालेली आहे आणि वाड्याची मालकी आता एका ट्रस्टकडे आहे ही माहितीही काकांकडून समजली. वाडा टिकवण्यासाठी अपेक्षित असलेला अमाप खर्च आणि हातात असलेला तोकडा वेळ पाहता हेरिटेज डिपार्टमेंटने त्वरीत हालचाल करणं गरजेचं आहे हे काका वारंवार सांगत होते. बोलता बोलता आजवर तिथे सर्वांनी मिळून साजरे केलेल्या गणपती, दिवाळीच्या आठवणीत फेरफटकाही मारून येत होते. वाड्याचं असं खचत जाणं आणि माणसांनी तिथून बाहेर पडणं त्यांच्या मनावर कुठेतरी आघात करून जात होतं… आणि ते जाणवत होतं.

वाड्यात तासभर घालवून आणि जमेल तेवढं नजरेत आणि मनात साठवून आम्ही बाहेर पडलो. तिथून निघण्याआधी ढासळणार्‍या तटबंदीचा क्लेश चेहर्‍यावर तीळमात्रही न दाखवणार्‍या त्या दरवाजाकडे पुन्हा एकदा मी वळून पाहिलं…
.
त्या भक्कम चिलखतामागे दडलेलं एक शरीर वयामुळे आता थकलेलं आहे आणि काळाच्या प्रहावाने केलेल्या जखमांनी पोखरलं गेलय ही कल्पनाच खूप त्रास देऊन गेली…

काय आहे ना…. शेवटी घर हे घर असतं… मग ते कोणाचंही का असेना !

Picture credit: Dolly Kabaria
Picture credit: Dolly Kabaria
Picture credit: Dolly Kabaria
Picture credit: Dolly Kabaria
Subscribe
Notify of
0 Comments
Inline Feedbacks
View all comments